धाराशिव दि.१० सप्टेंबर ( प्रतिनिधी ) जिल्ह्यातील आगामी धार्मिक सण, उत्सव तसेच आंदोलनात्मक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.हा आदेश महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी शोभा जाधव यांनी काढला आहे.या आदेशानुसार ११ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १ वाजेपासून ते २४ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरून) संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी लागू राहील.
या आदेशानुसार शस्त्रे,धारदार हत्यारे, बंदूक,काठ्या, दगड,स्फोटके आदी घातक वस्तू जवळ बाळगणे प्रतिबंधित आहे. आवेशी भाषणे,भडकावू घोषणा,असभ्य वर्तन,राज्याची सुरक्षितता व सामाजिक सलोखा धोक्यात आणणारी कृती करणे मनाई आहे.पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव परवानगीशिवाय जमवणे, मोर्चा किंवा मिरवणूक काढणे बंदी आहे. चित्रफलक,घोषवाक्ये,प्रतीके, विडंबनात्मक अभिनय यावरही बंदी असेल.
अंत्ययात्रा,धार्मिक विधी,लग्न सोहळे, सामाजिक सण,शासकीय कार्यक्रम, चित्रपटगृहे व नाट्यगृहे यांना सूट राहील.शासकीय सेवेत तैनात कर्मचारी यांना आदेश लागू राहणार नाही.
कोणतीही सभा,मिरवणूक किंवा प्रचारसभा घेण्यापूर्वी पोलीस अधिक्षक किंवा संबंधित उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे.
प्रशासनाने आवाहन केले आहे की, नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आदेशाचे पालन करावे व कायदा हातात घेऊ नये.असे या आदेशात नमूद केले आहे.