वाशी : अनधिकृत विना परवाना खत साठ्यावर 4.61 लाखांचा साठा जप्त, गुन्हा नोंद
धाराशिव (प्रतिनिधी) – वाशी तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या कुक्कुटपालन शेडमध्ये विनापरवाना रासायनिक खताचा मोठा साठा आढळून आला आहे. एकूण 456 पोती म्हणजेच 20 मेट्रिक टन रासायनिक खत जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजित किंमत सुमारे 4.61 लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा व तालुका कृषी विभागाच्या संयुक्त भरारी पथकाने केली. जिल्हाधिकारी, निविष्ठा व गुणवत्ता नियंत्रण विभागाचे अधिकारी व लातूर विभागाच्या कृषी सहसंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. कारवाईदरम्यान शेतकऱ्याच्या कुक्कुटपालन शेडमध्ये मोठ्या प्रमाणात विनापरवाना खत साठवून ठेवलेले आढळले.
या प्रकरणात फिर्याद तालुका कृषी अधिकारी, वाशी यांनी दिली असून सखोल तपास सुरू आहे. या कारवाईत जिल्हा गुणवत्ता निरीक्षक, पंचायत समिती वाशी कार्यालयाचे कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी, तसेच तालुका कृषी कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले होते.
या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अनधिकृत खत साठा करणाऱ्यांवर कृषी विभागाकडून कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.