
धाराशिव :
शिंगोली येथील आदर्श विमुक्त जाती प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत श्री. नागनाथ पाटील सर, श्री. सुर्यकांत बडदापुरे सर व श्रीमती शोभा बनसोडे यांच्या सेवापुर्तीचा समारंभ मोठ्या उत्साहात व सन्मानपूर्वक पार पडला. या समारंभाला अध्यक्षस्थानी श्री. सिध्देश्वर मुंबरे होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. बाबुराव देवराव चव्हाण (अध्यक्ष, स्नेह ग्रामविकास, देवताळा), श्री. अनंत रामदास चव्हाण (श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळ, मनोहर तांडा), श्री. शेषेराव राठोड (केंद्रप्रमुख, उपळे), श्री. अण्णासाहेब चव्हाण (मुख्याध्यापक, विद्या निकेतन माध्यमिक आश्रमशाळा, शिंगोली), श्री. शिवाजी ढगे, श्री. बी. एच. मुखम, कुमंत शिंदे (माजी मुख्याध्यापक), दत्तात्रय शंकर मुखम (मुख्याध्यापक, शासकीय निवासी आश्रमशाळा लामजना) आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रथमत: शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी श्री. नागनाथ पाटील, श्री. सुर्यकांत बडदापुरे आणि श्रीमती शोभा बनसोडे यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ, हार, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.
दत्तात्रय मुखम यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “मी नागनाथ पाटील सरांचा विद्यार्थी असून, त्यांच्या मार्गदर्शनामुळेच राष्ट्रपती पुरस्कार मिळवता आला. ते माझ्यासाठी द्रोणाचार्यसारखे आहेत.”
श्री. अनंत चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज अधोरेखित केली. श्री. शिवाजी ढगे यांनी शिंगोली आश्रमशाळेच्या निर्मितीचा इतिहास सांगताना त्यावेळच्या प्रतिकूल परिस्थितींचा उल्लेख केला.
कार्यक्रमात बोलताना सिध्देश्वर मुंबरे यांनी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांच्या शिस्तीचे व प्रगतीचे कौतुक केले. निवृत्त होणाऱ्या सर्व शिक्षकांनी आपल्या भावना व्यक्त करताना शाळेतील आठवणींनी मन भरून आले.
या प्रसंगी सतीश शहाजी कुंभार (मुख्याध्यापक) यांनी मान्यवरांना छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वरूढ प्रतिमा देऊन सन्मानित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत जाधव, शेषेराव राठोड, खंडू पडवळ, प्रशांत राठोड, शानिमे कैलास, मल्लिनाथ कोणदे, विशाल राठोड, इम्रान शेख, सचिन राठोड, मदनकुमार आमदापुरे, श्रीमती सुरेखा कांबळे, श्रद्धा सूर्यवंशी, ज्योती राठोड, ज्योती साने, बालिका बोयणे, रत्नाकर पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन दिपक खबोले यांनी केले.
या सोहळ्याला शाळेतील विद्यार्थी, कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारंभाच्या माध्यमातून तीन शिक्षकांच्या सेवेला सन्मानपूर्वक निरोप देत एक सुंदर आदरांजली वाहण्यात आली.