धाराशिव येथे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयासोबतच ५०० खाटांचे नवीन जिल्हा रुग्णालय मंजूर केले होते.परंतु त्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने त्याचे काम रखडले होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असता त्यांनी आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण विभागासाठी मंजूर निधीमधून खास बाब म्हणून धाराशिवच्या रुग्णालयाला २७६.२५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याने जिल्ह्यातील जनतेला आता जवळपास १००० खाटांची सोय होणार असल्याची माहिती मित्र चे उपाध्यक्ष आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
आशियाई विकास बँकेचा निधी हा वैद्यकीय शिक्षण विभागाला राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या रुग्णालयात सुविधा निर्माण करण्यासाठी उपलब्ध करण्यात आला आहे.याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणविस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती.त्याबैठकीत मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या विनंतीला मान देत याला अपवाद करत खास बाब म्हणून धाराशिव जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयाला २७६.२५ कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी महायुती सरकारने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत व रुग्णालयासाठी नुकताच ४०४ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे.लवकरच निविदा प्रक्रिया देखील केली जाणार आहे.त्यामुळे येत्या दोन वर्षात सर्व सोयीने युक्त सुसज्ज असे ४३० खाटांचे रुग्णालय नागरिकांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने आता वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालयाच्या ४३० खाटा , जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या ५०० खाटा व स्त्री रुग्णालयाच्या ६० मिळून जवळपास १००० खाटा उपलब्ध होणार आहे.याचा फायदा सामान्य नागरिकांसह वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील होणार आहे.याचा आधार घेत भविष्यात वैद्यकीय शाखेच्या पदव्युत्तर शिक्षणाचे कोर्सेस सुरू करण्याचा मानस आमदार पाटील यांनी व्यक्त केला आहे.