
धाराशिव – मागील तीन महिन्यांपासून धाराशिव व बार्शी तालुक्यात दहशत माजवणाऱ्या वाघाचा शोध अद्यापही सुरूच आहे. वन विभागाने मोठ्या प्रयत्नांनंतरही वाघाला पकडण्यात यश मिळालेले नाही. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वन विभागाने शोध मोहिमेत अधिक गती द्यावी, अशी मागणी होत आहे. काही दिवसापूर्वी एक बिबट्या पकडला आहे त्यातच वन विभाग खुश होऊन समाधान मानत आहे. अशी चर्चा सुरू आहे.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मागील दहा ते पंधरा दिवसांपासून वाघ येडशी आभारण्यात दिसून आलेला नाही. मात्र, तो अपसिंगा व घाटंग्री या परिसरामध्ये फिरत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे वाघ पकडण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. वन विभागाने या भागात कॅमेरे बसवले असून, वाघाच्या हालचालींवर सतत नजर ठेवली जात आहे.
कॅमेऱ्यात हालचालींचा अभाव – शोध मोहिमेला अडथळा
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जोपर्यंत वाघ येडशी आभारण्याच्या परिसरात परतत नाही व त्या ठिकाणी लावलेल्या कॅमेऱ्यात त्याच्या हालचाली कैद होत नाहीत, तोपर्यंत वाघाला पकडणे कठीण होईल. त्यामुळे वन विभागाने स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
स्थानीय नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
धाराशिव व बार्शी तालुक्यातील अनेक गावांमध्ये वाघाच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. शेतकरी आपल्या शेतात काम करताना घाबरलेले आहेत, तर अनेकांनी रात्रीच्या वेळी बाहेर जाणे टाळले आहे. वन विभागाने वाघ पकडण्यासाठी अधिक व्यापक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत.
वन विभागाचे पुढील पाऊल
वन विभागाने वाघ पकडण्यासाठी अधिक व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अधिक कॅमेरे बसवले जात आहेत. तसेच वन्यजीव तज्ज्ञांच्या मदतीने शोधमोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. स्थानिक प्रशासनही नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलत आहे.
दरम्यान, वाघाला पकडण्याच्या मोहिमेत यश मिळण्यासाठी वन विभाग आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन सहकार्य करावे, असे आवाहन वन विभागाने केले आहे. आगामी काळात वाघ पकडला जाण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे.