
धाराशिव,दि.1-
पवित्र रमजान महिन्यात ईद जवळ आलेली असताना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावातील मशिदीमध्ये बॉम्बस्फोट करणार्या आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी मुस्लिम बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे. मंगळवारी (दि.1) मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
निवेदनात म्हटले की, अर्धमसला गावातील मशिदीमध्ये बॉम्बस्फोट करुन हिंदू-मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न दोन आतंकवाद्यांनी केला आहे. यामध्ये मशिदीचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रामध्ये मागील काही वर्षापासून मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळावर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. हिंदु-मुस्लिम समाजामध्ये द्वेषभावना निर्माण व्हावी या हेतुने काही जातीयवादी नेते प्रक्षोभक वक्तव्य करुन दंगल घडविण्याचा प्रयत्न करत आहेत. याचाच परिणाम म्हणून सदर बॉम्बस्फोट घडविण्यात आलेला आहे.
रमजानचा पवित्र महिना सुरु असताना व दोन दिवसांवर ईद असताना मशिदीमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या प्रकरणात वेळीच कठोर कारवाई न झाल्यास यापुढेही असे गैरकृत्य करणार्या लोकांचे मनोबल वाढून ते आणखी गंभीर गुन्हे करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणातील आतंकवाद्यांविरुद्ध मकोका कायदा लावून देशद्रोहाचा खटला दाखल करावा व दोन्ही आरोपींची घरे बुलडोजर लावून पाडण्यात यावी अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर खलील सय्यद, मैनुद्दीन पठाण , अँड परवेज अहमद, अँड इम्रान पठाण तौफिक काझी, जमीर पठाण, पृथ्वीराज चिलवंत, शाहनवाज सय्यद, बाशा तांबोळी, मोईन पठाण, अबरार कुरेशी, निहाल शेख, मोहसीन शेख ,जमीर शेख , इरशाद सय्यद, जफर शेख, इरफान शेख, अॅड. इम्रान खान, अॅड. परवेज, मुश्ताक हुसेनी, आतेफ काझी, अखिल रजवी, मैनुद्दिन खरचि आदींची स्वाक्षरी आहे.