
धाराशिव : शिंगोली येथील विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळेत भारताच्या थोर स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहीद दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैशाली शितोळे मॅडम होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून विशाल राठोड सर उपस्थित होते.
या वेळी क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. आपल्या भाषणात अध्यक्षांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात या क्रांतिकारकांच्या अतुलनीय धैर्य, त्याग आणि देशभक्तीचे महत्त्व विशद केले. ब्रिटिश साम्राज्यवादाच्या जुलमी राजवटीला संपवण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.
विशाल राठोड सर यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार मांडून क्रांतिकारकांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, लाला लजपतराय यांच्यावर इंग्रज अधिकाऱ्याने लाठीहल्ला केला होता, त्याचा बदला घेण्यासाठी भगतसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्कॉटच्या साथीदार सॅडर्सवर गोळीबार केला. तसेच असेम्बलीत बॉम्बस्फोट घडवून इंग्रज सरकारला आव्हान दिले. त्यांच्या बलिदानामुळे भारतीय युवक स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होऊ लागले आणि इंग्रज सरकार अधिक भयभीत झाले.
या कार्यक्रमास विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अण्णासाहेब चव्हाण, आदर्श आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सतीश कुंभार, तसेच नागनाथ पाटील, रत्नाकर पाटील, सुर्यकांत बडदापुरे, दिपक खबोले, सुधीर कांबळे, प्रशांत राठोड, कैलास शानिमे, सचीन राठोड, मल्लिनाथ कोणदे, मदन कुमार आमदापुरे, ज्योती साने, बालिका बोयणे, ज्योती राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रद्धा सुर्यवंशी यांनी मानले. आश्रमशाळेचे कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.