धाराशिव : जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जुगार विरोधी मोहिमेअंतर्गत धाराशिव, भुम आणि मुरुम पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी कारवाई करून चार आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. या कारवाईत पोलिसांनी जुगार साहित्यासह रोख रक्कम जप्त केली आहे.
धाराशिव शहर पोलीस ठाण्याची कारवाई
धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने 13 मार्च रोजी सकाळी 10 वाजता जनावरांच्या आठवडी बाजाराजवळ छापा टाकला. या वेळी संजय राजाभाऊ पेठे (वय 26, रा. नेहरू चौक, धाराशिव) आणि दिनेश अंगद थोरबोले (वय 24, रा. फकीरा नगर, वैरागा नाका, धाराशिव) हे टायगर गेम मटका जुगार खेळत असल्याचे आढळले. त्यांच्याकडून मोबाईल, मोटारसायकल आणि रोख रक्कम असा एकूण 1,09,800 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुम पोलीस ठाण्याची कारवाई
भुम पोलीसांनी 13 मार्च रोजी संध्याकाळी 4.05 वाजता कमानी जवळ बाजार रोड येथे छापा टाकून अंकुश कल्याण पवार (वय 45, रा. इंदिरा नगर, भुम) याला मटका जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. पोलिसांनी त्याच्याकडून जुगार साहित्य आणि 550 रुपये रोख रक्कम जप्त केली. त्याच्याविरुद्ध देखील महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 12(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुरुम पोलीस ठाण्याची कारवाई
मुरुम पोलीसांनी 13 मार्च रोजी दोन स्वतंत्र ठिकाणी छापा टाकून दोन आरोपींवर कारवाई केली. दुपारी 2.30 वाजता भोसगा शिवार, आष्टा मोड येथे एनएच 65 रोडलगत बालाजी बसु कारले (वय 26, रा. कोळनुर पांढरी, ता. लोहारा) याला कल्याण मटका जुगार खेळताना पकडले. त्याच्याकडून 530 रुपये जप्त करण्यात आले. तर संध्याकाळी 4.45 वाजता मुरुम बसस्थानकाजवळ जावेद सरदार मुरशद (वय 31, रा. चिंचोली भुयार, ता. उमरगा) याला कल्याण मटका जुगार खेळताना अटक करण्यात आली. त्याच्याकडून 840 रुपये रोख जप्त करण्यात आले. दोघांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
धाराशिव जिल्ह्यात जुगारावर आळा घालण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असून, पुढील काळात अशा प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.