धाराशिव जिल्ह्यात बर्ड फ्लूचा वाढता प्रादुर्भावप्रतिबंधासाठी तालुकानिहाय समित्या गठीत

Spread the love

धाराशिव,दि.५ मार्च ) जिल्ह्यातील ढोकी गावात मृत कावळ्यांचा होकारार्थी बर्ड फ्लूच्या अहवालानुसार (Avian Influenza H5N1) बर्ड फ्ल्युचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.चिकन सेंटर आणि परिसरातील कुक्कुट पक्ष्यांचे तपासणी अहवालही सकारात्मक आल्याने संसर्गाचा धोका अधिक वाढला आहे.त्यामुळे बर्ड फ्ल्यूच्या संसर्ग कमी करण्यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्री.किर्ती किरण पुजार यांनी तालुकानिहाय प्रतिबंधात्मक समित्या गठीत करण्याचे आदेश दिले आहेत.बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे.प्रभावित परिसरात पोलिस बंदोबस्त,निर्जंतुकीकरण आणि कुक्कुट पक्ष्यांच्या विल्हेवाटीच्या प्रक्रियेस गती देण्यात आली आहे.तसेच बाजारपेठांवर नियंत्रण,स्थलांतरित पक्ष्यांवर देखरेख आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर भर देण्यात आला आहे.

बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी तालुकानिहाय समित्या गठीत केल्या असून,संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.

तहसीलदार हे समितीचे अध्यक्ष असून समितीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे.बर्ड फ्लू संसर्गाचा प्रसार होणार नाही याची विशेष दक्षता घेणे याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.गटविकास अधिकारी हे सदस्य असून समितीच्या कामकाजात समन्वय साधणे. आवश्यक साहित्य जसे की प्लास्टिक एचडीपीई बॅग,ब्लिचिंग पावडर व चुना इत्यादींचा पुरवठा करणे.आणि मृत कुक्कुट पक्ष्यांचे स्थळ पंचनामे तलाठी,ग्रामसेवक आणि पशुधन विकास अधिकाऱ्यांमार्फत करून घेणे ही जबाबदारी आहे.

पशुधन विकास अधिकारी( विस्तार) हे सदस्य सचिव असून दैनंदिन अहवाल संकलित करून वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.प्रभावित पोल्ट्री फार्मचे प्रवेशद्वार आणि परिसर २ टक्के सोडियम हायपोक्लोराइट किंवा पोटॅशियम परमॅग्नेटने निर्जंतुकीकरण करणे आणि
समितीच्या कामकाजाची सर्व नोंदी अद्ययावत ठेवतील.पोलीस निरीक्षक हे प्रभावित पोल्ट्री फार्मच्या १ कि.मी. त्रिज्येतील परिसरात नागरिकांच्या हालचालींवर तसेच इतर पक्षी आणि प्राण्यांच्या वाहतुकीवर प्रतिबंध लावणे.मृत पक्ष्यांची विल्हेवाट लावताना गर्दी होणार नाही याची खबरदारी घेतील.

तालुका आरोग्य अधिकारी हे मोहीम सुरू होण्यापूर्वी जलद कृती दलच्या सर्व सदस्यांची आरोग्य तपासणी करणे आणि आवश्यकतेनुसार पीपीई किट्सचा पुरवठा करण्याचे काम करतील.उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग हे सदस्य म्हणून मृत पक्ष्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक स्प्रे मशीन, फॉगर मशीन,सक्शन मशीन उपलब्ध करून देण्याचे काम करतील.पशुधन विकास अधिकारी संस्था प्रमुख हे सदस्य असून प्रभावित क्षेत्रात जनजागृती मोहिम राबवणे.बर्ड फ्लूविषयी नागरिकांना काय ‘करावे आणि करू नये’ (Dos & Don’ts) याबाबत माहिती देणे.प्रभावित क्षेत्राच्या 10 कि.मी.परिसरातील बाजारपेठांवर देखरेख ठेवणे व दैनंदिन अहवाल पंचायत समिती विस्तार अधिकाऱ्यांना सादर करणे. क्षेत्रवनाधिकारी हे स्थलांतरित व वन्य पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रसार होऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभागाशी समन्वय साधणे आणि आवश्यक उपाययोजना करणे.

उपअधीक्षक,तालुका निरीक्षक,भूमी अभिलेख (सदस्य) यांच्याकडे Culling आणि Surveillance Zone चे स्केल मॅप तयार करणे व मृत पक्ष्यांची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य जमीन निश्चित करणे आदि जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत.

जिल्हा प्रशासनाने बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी तातडीने आणि काटेकोर उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले आहेत.पोलिस,आरोग्य पशुसंवर्धन,महसूल आणि वन विभाग यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणांना तत्परतेने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
*


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!