प्राथमिक आरोग्य केंद्र सिंदफळ येथील देण्यात आलेल्या चुकीच्या औषध उपचारामुळे मुलीच्या तब्येतीत बिघाड:मुलीच्या आईचा गंभीर आरोप

Spread the love

तुळजापूर: सिंदफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉक्टरांनी चुकीचा औषध उपचार केल्याने एका चिमुरडीच्या तब्येतीवर गंभीर परिणाम झाल्याची घटना उघडकीस आली आहे. समिना बाबूलाल कोतवाल यांनी याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, धाराशिव यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे.

तक्रारीनुसार, दि. 22 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉक्टर पारधे गावात सर्वेक्षणासाठी आले होते. त्यांनी समिनाच्या दिराच्या मुलीला, सानिया हिला तपासले असता, तिच्या उजव्या गालावरील जन्मजात लालसर चट्ट्याबाबत अधिक तपासणी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, समिना हिने सानियाला सरकारी दवाखान्यातील डॉ. शिंदे यांच्याकडे तपासणीसाठी नेले.

डॉ. शिंदे यांनी तपासणी केल्यानंतर तो चट्टा कुष्ठरोगाचा असल्याचे सांगितले आणि सहा महिन्यांच्या औषधोपचारांची शिफारस केली. त्याच वेळी त्यांनी एका गोळ्यांच्या पॅकेटमधील तीन गोळ्या सानियाला त्वरित खायला लावल्या व उर्वरित गोळ्या घरी रोज एक वेळा देण्यास सांगितल्या. समिना हिने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सानियाला 16 दिवस नियमित औषध दिले.

परंतु, 16व्या दिवशी संध्याकाळी सानियाला अचानक ताप भरला व शरीरावर लालसर फोड उठले. दुसऱ्या दिवशी सकाळी समिना हिने सानियाला परत सरकारी दवाखान्यात उपचारासाठी नेले.

या प्रकरणात डॉक्टरांनी योग्य तपासणी न करता कुष्ठरोगावरचे औषध देऊन सानियाच्या आरोग्याशी खेळ केला असल्याचा आरोप मुलीची आई समिना कोतवाल यांनी केला आहे. यासंदर्भात दि. 15 जानेवारी 2025 रोजी त्यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली असून, आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडेही न्यायाची मागणी केली आहे.

या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समिना कोतवाल यांनी केली आहे. तसेच,चुकीच्या उपचारामुळे सानियाच्या तब्येतीवर झालेल्या परिणामाबाबत प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!