महाडीबीटी शिष्यवृत्ती अर्ज तात्काळ सादर करा , समाज कल्याण विभागाचे आवाहन
धाराशिव,दि.२४ ( प्रतिनिधी ) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून महाविद्यालयांनी प्रलंबित अर्ज तात्काळ सादर करावेत,असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत यांनी केले आहे.सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी महाडीबीटी संकेतस्थळ (http://mahadbtmahit.gov.in) २५ जुलै २०२४ पासून सुरू करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील ६३२३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले असले,तरी १३१० अर्ज महाविद्यालय स्तरावर अद्याप प्रलंबित आहेत.संबंधित महाविद्यालयांनी हे अर्ज तातडीने तपासून सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवावेत.तसेच,मागील वर्षाच्या तुलनेत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांची महाडीबीटी प्रणालीवरील शिष्यवृत्ती अर्ज नोंदणी कमी आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत,त्यांना अर्ज भरण्याची सूचना महाविद्यालयांनी द्यावी,असेही आवाहन करण्यात आले आहे.
महाविद्यालयांनी त्यांच्या लॉगिनमध्ये कोणताही अर्ज प्रलंबित राहणार नाही,याची काळजी घ्यावी.त्रुटी असलेले अर्ज आवश्यक दुरुस्ती करूनच मंजुरीसाठी सादर करावेत.