धाराशिव दि २० फेब्रुवारी ( प्रतिनिधी) ड्रगचा काळाबाजार करून हजारो तरुणांना देशोधडीला लावून श्री तुळजाभवानी मातेचे पवित्र क्षेत्र भष्ट करणाऱ्या ड्रग माफियांना सोडणार नाही.पोलीस प्रशासनाने पुढील ७२ तासांमध्ये या संदर्भात केलेल्या कारवाईचा लेखी अहवाल आपणाला सादर करावा.असे निर्देश परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी पोलिसांना दिले.
आज २० फेब्रुवारी रोजी पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी तुळजापूर येथे पहिल्यांदाच बैठक घेऊन श्री तुळजाभवानी मंदिर पुजाऱ्यांनी संदर्भात केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाला वरील निर्देश दिले.यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे,पोलीस अधीक्षक संजय जाधव,पुजारी मंडळाचे अमर कदम यांच्यासह अन्य पुजारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.सरनाईक पुढे म्हणाले की,तुळजापूरसारख्या ग्रामीण क्षेत्रांमध्ये ड्रग तस्करीच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत.गेली अडीच वर्षे यासंदर्भात तक्रार करणाऱ्या मंदिर पुजाऱ्यांच्या शिष्टमंडळाला बेदखल करणे ही अत्यंत गंभीर असून संशयाची सुई पोलिसांकडे देखील दाखवली जात आहे.अशा परिस्थितीमध्ये या पूर्ण प्रकरणाची पाळेमुळे खणून काढून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी असे स्पष्ट आदेश पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी पोलीस अधीक्षकांना यावेळी दिले .
या संदर्भात बोलताना पालकमंत्री श्री. सरनाईक पुढे म्हणाले की,राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या प्रकरणाची गंभीर चर्चा झाली असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी देखील या प्रकरणाबाबत कठोर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री म्हणून मला दिले आहेत.त्यामुळे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ही माझी जबाबदारी आहे की,तुळजापूर सारख्या पवित्र तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अशाप्रकारे ड्रग तस्करीच्या माध्यमातून हजारो तरुणांना देशोधडीला लावणाऱ्या माफियाना कोणत्याही प्रकारची दया-माया दाखवली जाणार नाही.यामध्ये कोणाचा राजकीय वरदहस्त असेल किंवा राजकीय व्यक्ती प्रत्यक्ष सहभागी असेल तरी पोलिसांनी कोणाचाही विचार न करता सर्व आरोपींना तुरुंगाची हवा दाखवावी असे स्पष्ट निर्देश त्यांनी पोलिस प्रशासनाला यावेळी दिले आहेत.