कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदाराला दंड , जाणीवपूर्वक कामे टाळणाऱ्याचे कंत्राट रद्द करण्याचा प्रस्ताव

Spread the love

उदभव विहिरींची कामे अपूर्ण असल्याने योजनेच्या अंमलबजावणीस विलंब

धाराशिव,दि.१७ फेब्रुवारी ( प्रतिनिधी ) जिल्ह्यातील ६९ गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक असलेल्या जागेचा ताबा ग्रामपंचायतींकडून उशिरा मिळाल्याने योजनांच्या अंमलबजावणीत विलंब झाला. तसेच,महाराष्ट्र ग्रामीण पेयजल योजनेतील (म.प्रा.रो.ह.यो.) उदभव विहिरी अपूर्ण स्थितीत असल्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या.

३८ योजनांचे उदभव अयशस्वी झाल्याने नवीन प्रमाणपत्र मिळवून सुधारणा करावी लागली,त्यामुळेही कामांना उशीर झाला आहे.काही योजनांचे काम संथगतीने सुरू आहे. त्यांना निविदा अटींनुसार मुदतवाढ देण्यात आली आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या मार्गदर्शनात वेळोवेळी आढावा बैठक घेण्यात येत असून, कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

जल जीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत

जिल्ह्यातील ५९४ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत.या योजनांतर्गत ग्रामस्थांना प्रति माणशी ५५ लिटर दररोज पाणीपुरवठा केला जाणार आहे.२४६ योजना पूर्ण करून ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात आल्या असून, त्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

३४८ योजनाची कामे प्रगतिपथावर आहेत,त्यापैकी ११५ योजनांचे ७६ ते १०० टक्के काम पूर्ण,१३५ योजनांचे ५१ ते ७५ टक्के काम पूर्ण,७० योजनांचे २६ ते ५० टक्के काम पूर्ण, २७ योजनांचे २५ टक्केपेक्षा कमी काम पूर्ण आहे.ठरलेल्या मुदतीत काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांना ०.५ ते ६ टक्के दंड आकारण्यात आला आहे.जाणीवपूर्वक काम टाळणाऱ्या ठेकेदारांचे कंत्राट रद्द करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून,त्यांची सुरक्षा अनामत रक्कम जप्त केली जाणार आहे.

पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण करण्यासाठी कठोर पावले उचलली जात असून,अपूर्ण योजनांचे काम गतीमान करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत.अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मोहन सरवदे यांनी दिली.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!