धाराशिव – शहरातील स्वच्छतेची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून, नागरिकांना अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे. एक वर्षापूर्वी नगरपालिकेने जुना ठेकेदार बदलून नव्या ठेकेदाराला जबाबदारी सोपवली, मात्र परिस्थितीत काहीच सुधारणा झालेली नाही. नाल्यांची स्वच्छता वेळेवर केली जात नसल्याने अनेक भागांमध्ये नाल्या तुंबल्या आहेत. तसेच, कचरा वेळेवर न उचलल्याने दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. अनेक भागांमध्ये एक दिवस आड घंटागाडी येते. दोन दोन महिन्यापासून अनेक भागांमध्ये नाली स्वच्छता झालेली नाही त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरील फक्त स्वच्छता करून तोंड पुसण्याचे काम ठेकेदाराकडून करण्यात येत आहे
शहरातील मुताऱ्या देखील साफ केल्या जात नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रत्येक सार्वजनिक मुतारीत दुर्गंधी पसरली असून, त्याकडे प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष आहे. नागरिकांच्या फोनद्वारे केलेल्या तक्रारींकडे ठेकेदाराचे मॅनेजर फक्त गोडगोड बोलून विषय टाळत असल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत, नगरपरिषदेने तातडीने कारवाई करून ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच, शहराची स्वच्छता नियमित केली जावी व स्वच्छता कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे.
➡ नगरपालिकेने जबाबदारी स्वीकारून तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा शहरातील आरोग्य व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.