धाराशिव: शहरातील देशपांडे स्टँड जवळील कचरा डेपोमध्ये रोज कचरा जाळला जात असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जळलेल्या कचऱ्याच्या धुरामुळे गणेश नगर, उमर मोहल्ला, खाँजा नगर, फकिरा नगर आणि जुनी गल्ली परिसरात रात्रीच्या वेळी श्वास घेणे नागरिकांना कठीण झाले आहे. धुराच्या तीव्र वासाने दम घुटत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
कचरा डेपो शहराच्या मध्यभागी असल्याने त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. कचरा जाळल्याने मोठ्या प्रमाणात धूर आणि विषारी वायू बाहेर पडतात, ज्यामुळे श्वसन तसेच इतर गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी कचरा डेपो शहराबाहेर हलवण्याची मागणी केली आहे.
प्रशासनाने या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. कचरा डेपो शहराबाहेर हलवून, कचरा व्यवस्थापनाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी जोर धरत आहे.