मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
धाराशिव-
मराठवाड्यातील हजारो शेतकर्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.13) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे मराठवाड्यासह धाराशिव जिल्ह्यातील हजारो शेतकरी आणि प्लॉटधारकांना मोठा दिलासा मिळाला असल्याची माहिती शिवसेनेचे धाराशिव जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी दिली.
धाराशिव जिल्ह्यातील इनाम जमिनी, मदतमास जमिनी, खिदमत मास जमिनी, सिलिंग जमीन, कुळ जमीन व महार वतन जमीनी वर्ग एकमध्ये कायम ठेवण्या याव्यात याबाबत गेल्या तीन वर्षापासून विविध मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी शिवसेनेचे प्रवक्ते योगेश केदार यांच्यासमवेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याबाबत विनंती केली होती. सदरील विषयावर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समितीचे गठण केले होते. या समितीचा अहवाल प्रलंबित असल्याचे जिल्हाप्रमुख साळुंके यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर महसूल मंत्री विखे पाटील यांची भेट घेऊनही या विषयावर निर्णय घेण्याची विनंती केली होती. त्यावर हा प्रश्न मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मार्गी लावण्याचे आश्वासन मंत्री महोदयानी दिले होते. अखेर मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा हजारो शेतकरी, प्लॉटधारकांना लाभ होणार असल्याचे शिवसेनेचे धाराशिव जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी सांगितले.