जिल्हयातील शासकीय,निमशासकीय कार्यालय,खाजगी उद्योगात नोकरीची संधी ,
शिक्षणानुसार विद्यावेतन आणि अनुभव प्रमाणपत्रही मिळणार
धाराशिव, दि.८ ) युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” चालू आर्थिक वर्षापासून कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविण्यता विभागाने सुरु केली आहे. त्याअनुषंगाने शिक्षण पूर्ण करुन नोकरीसाठी अनुभवाच्या शोधात असलेल्या युवक वर्गाला विद्यावेतनासह शिक्षणाच्या बळावर अनुभवाची जोड देता यावी या उद्देशाने राज्य शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु केली आहे.जिल्हयातील युवकांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतंर्गत युवकांना विद्यावेतनासह नोकरीचा अनुभव मिळण्यासाठी मोठया प्रमाणात संधी उपलब्ध झाली आहे.उमेदवारांनी विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयात तसेच उद्योजकाकडील विविध पदावरील कामाचा अनुभव प्राप्त करण्यासाठी सहा महिन्याकरिता इंटर्नशीसाठी संबंधित शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय तसेच उद्योजक यांचेकडे उपलब्ध असलेल्या पदाकरिता उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन संबंधित आस्थापनेकडे इच्छूकता दर्शवावी.
बारावी पास विद्यार्थ्यांना प्रतिमहा सहा हजार आयटीआय,पदविका उत्तीर्ण युवकांना आठ हजार तर पदविधर, पदवित्तर युवकांना दहा हजार रुपये असे विद्यावेतन या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे.हे विद्यावेतन प्रशिक्षणार्थीच्या थेट बँक खात्यात
ऑनलाईन पध्दतीने दरमहा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाकडून अदा केले जाईल. प्रशिक्षणार्थी एका महिन्यात दहा दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असेल तर त्या महिन्याचे विद्यावेतन त्यांना दिले जाणार नाही.
18 ते 35 वयोगटातील युवक-युवतींना या योजनेत सहभागी होता येणार आहे.या योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रातील उद्योजकांना एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या १० टक्के व सेवा क्षेत्रासाठी २० टक्के उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील.तर शासकीय, निमशासकीय आस्थापना उद्योग,महामंडळ यामध्ये मंजूर पदाच्या ५ टक्के किंवा कमीत कमी एक याप्रमाणे उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील.तरी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा व या योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्याच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,धाराशिव येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे.