धाराशिव : धाराशिव लोकसभेचा प्रचार अंतिम टप्यात आला आहे. धाराशिवच्या विकासासाठी निधी द्यायचं सोडा; हा अनेकांच्या लग्नात जातो, जेवण करतो, फोटो काढतो, पण एक रुपयाचा आहेर देखील कधी कुणाला केलेला दिसला नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते ॲड.धनंजय धाबेकर यांनी विद्यमान खासदार ओमराजे निबांळकर यांच्यावर टीका केली.
धाराशिव लोकसभा मतदार संघाच्या महायुटीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचार सभेत ॲड.धनंजय धाबेकर बोलत होते.
ॲड.धनंजय धाबेकर म्हणाले, इतर लग्नांच सोडा पण बाप मेल्यानंतर वर्षभरात कराव्या लागणाऱ्या कित्तेक लग्नात याने हजेरी लावली. पण कधी त्यांना मदत म्हणून एक रुपयांचा देखील आहेर केला नाही. तो काय आपल्यासाठी निधी आणणार. गेल्या 20 वर्षांपासून ते राजकारणात आहेत. आम्हीच त्यांचा प्रचार केला. मात्र सांगण्यासारखे एकही काम त्यांनी केलेलं नाही. नेहमी दुसऱ्यांना बदनाम करण्याचे राजकारण त्यांनी केले आहे. केवळ कर्मकारी, अधिकाऱ्यांना शिव्या घालून काम करून घ्यायचं हा त्यांचा धंदा आहे. त्याच कर्मचाऱ्यांचा भ्रष्ट म्हणून ते उल्लेख करतात. सर्व नोकरदारांनी अधिकाऱ्यांना मिळत असलेल्या या वागणुकीचा मतदान करण्यापूर्वी विचार केला पाहिजे.
काही दिवसांपूर्वी ओमराजे निंबाळकर म्हणाले होते, कारखाना भंगार होता तर तुम्ही विकत का घेतला? पण आता जेव्हा त्या कारखान्या बाहेर ऊसाचे ट्रक लागताना त्यांना दिसत असतील, तेव्हा डॉ. तानाजी सावंतांनी हा कारखाना का घेतला? हे कळत असेल. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपल्या भागातील उसाला भाव मिळाला पाहिजे. या भागातील कामगारांच्या हाताला रोजगार दिला पाहिजे, या भावनेतून सावंत यांनी हा कारखाना घेतला असल्याचे धाबेकर म्हणाले.