धाराशिव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी आपला जोरदार प्रचार सुरू केला आहे. अर्चना पाटील यांच्यासाठी धाराशिव मतदारसंघात महायुतीचे सर्वच जण झपाट्याने कामाला लागले आहेत. अशातच आज भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी जरांगे पाटलांचं शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत केले. यातच जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर धाराशिव मतदारसंघातील राजकीय गणित बदलणार अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
अर्चना पाटील यांच्यासाठी आ.राणाजगजितसिंह पाटील प्रत्यक्ष मैदानात उतरून जोरदार प्रचार करतांना दिसत आहेत. अशातच त्यांनी आता मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. मराठा आरक्षणाच्या लढाईत जरांगे पाटील राज्यात चर्चेत आले होते. परंतु त्यांनी लोकसभा निवडणुकीत कोणतीही भुमिका जाहीर केली नव्हती. मात्र ज्यांना तुम्हाला मतदान करायचं आहे, त्यांना तुम्ही मतदान करा असे जरांगे पाटील यांनी म्हटले होते. अशातच आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आहे. त्यामुळे याचा मतदानावर परिणाम होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, धाराशिव लोकसभा मतदारसंघात अर्चना पाटील यांच्या पाठीमागे महायुतीच्या नेत्यांनी मोठी ताकद उभी केली आहे. शिवसेना शिंदे गट, भाजपसह अजित पवार गटातील सर्वच स्थानिक पदाधिकारी नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. अशातच आता आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी आता काही मोठ्या नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरूवात केलीय.