धाराशिव : देशात १८ व्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. उद्या राज्यातील दुसऱ्या टप्यातील मतदान होणार आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्यात मतदान होणार असून प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे. या मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, बसपा, शेतकरी संघटना आदी पक्षांसह अपक्ष असे ३१ उमेदवार रिंगणात आहेत. प्रत्येक उमेदवाराकडून आपल्याकडे मतदान खेचून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मतदारसंघातील नवमतदार कुणाच्या पारड्यात आपले मत टाकतात हे महत्वपूर्ण ठरणार आहे.
धारशिवा मध्ये २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी १८ लाख ८६ हजार २३८ मतदार होते. या तुलनेत सन २०२४ च्या निवडणुकीत त्यात १९ लाख ९२ हजार ७३७ अशी वाढ झाली आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीसाठी प्रथमच १ लाख ६ हजार ४९९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे हे नवमतदार कोणाला कौल देणार यावरही निकालाची बरीच समीकरणे अवलंबून आहेत.
धाराशिव लोकसभेसाठी २०१९ मध्ये ६३.४२ टक्के इतके मतदान झाले होते. तर १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यावेळी ३१ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यामुळे मतांची विभागणी होणार का हेही पाहावे लागणार आहे. २०१९ च्या लोकसभेसाठी १८ लाख ८६ हजार २३८ मतदारांपैकी ११ लाख ९६ हजार १६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. २०२४ मध्ये १ लाख ६ हजार ४९९ मतदारसंख्या वाढली आहे. वाढलेले मतदान कुणाच्या पथ्यावर पडते, यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे. धाराशिव लोकसभेसाठी २००९ मध्ये ५४.४७ टक्के, २०१४ मध्ये ६४.४१ टक्के तर २०१९ मध्ये ६३.४२ टक्के मतदान झाले होते. २०१४ मध्ये ११ लाख १५ हजार ९९१ इतके मतदान झाले असून २०१९ मध्ये ११ लाख ९६ हजार १६६ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी मविआकडून विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, महायुतीकडून अर्चना पाटील तर वंचितकडून भाऊसाहेब आंधळकर हे निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी विरुध्द महायुती असा सामना होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. केंद्रातील भाजप सरकारने युवकांसाठी राबवलेल्या विविध योजनांचा विचार करता नवमतदार आणि युवकांचा कौल महायुतीच्या म्हणजे अर्चना पाटील यांच्या बाजूने असेल अशी शक्यता राजकीय जाणकार वर्तवत आहेत.