धाराशिव-लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडतांना दिसत आहेत. यातच धाराशिव जिल्ह्यातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेत तथा माजी मंत्री मुधकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात दाखल झाले आहेत. त्यामुळे धाराशिव मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून याचा फायदा धाराशिवच्या उमेदवार अर्चना पाटील यांना होण्याची शक्यता आहे. सुनील चव्हाण यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकत आज भाजपमध्ये प्रवेश केला असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते.
माजी मंत्री मधुकर चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण यांनी महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटी सचिव पदाचा राजीनामा दिला आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत एक पत्र लिहिलं असून त्यात राजीनाम्याचा उल्लेख करण्यात आला. त्याआधी मागील दोनच दिवसापुर्वी मधुकरराव चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी बसवराज पाटील देखील उपस्थित होते. त्यामुळे सुनील चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती.
सुनील चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. चव्हाण यांच्या प्रवेशामुळे भाजपची जिल्ह्यात मोठी ताकद वाढणार आहे. सुनील चव्हाण यांचे वडील मधुकरराव चव्हाण राजकारणातील एक अनुभवी व्यक्तीमत्व असून मधुकर चव्हाण यांनी मात्र सध्या कोणताही निर्णय घेतलेला नाही.