धाराशिव जिल्हा पाटील कुटुंबियांनी भकास केला -शिवसेना तालुकाप्रमुख सोमाणी

Spread the love

भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष काळे एजंटांचा वसुली अधिकारी – सोमनाथ गुरव

धाराशिव-
गेल्या चाळीस वर्षापासून सत्ता उपभोगणार्‍या डॉ. पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र राणाजगजितसिंह पाटील यांनी धाराशिव जिल्हा भकास केल्याचा घणाघाती आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमाणी यांनी केला.

धाराशिव येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोमवारी  (दि.26) तालुकाप्रमुख सतीश सोमाणी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना शहरप्रमुख सोमनाथ गुरव, पंचायत समितीचे माजी सभापती श्याम जाधव यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना सतीश सोमाणी म्हणाले की, धाराशिव जिल्ह्याच्या विकासाच्या नावाखाली डॉ.पद्मसिंह पाटील हे अब्जाधीश खासदारांच्या यादीत तिसर्‍या क्रमांकावर आले, परंतु धाराशिव जिल्हा आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत तिसर्‍या क्रमांकावर आला. अशा कर्तृत्त्ववान नेत्याचे चांगुलचालन करण्याचे काम भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे हे करत आहेत. डॉ.पद्मसिंह पाटील यांनी धाराशिव येथे मंजूर  झालेले वैद्यकीय महाविद्यालय स्वतःच्या संस्थेच्या घशात घातले. सुतगिरणी, कुकुट्टपालन उद्योगही बुडविले. हजारो बेरोजगारांचा रोजगार बुडवून विकासाची भाषा करणार्‍या आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जनाची नाही तरी मनाची लाज बाळगावी, त्यांच्या या कामाची कीव येत असल्याचेही सतीश सोमाणी म्हणाले.

भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष काळे एजंटांचा वसुली अधिकारी – सोमनाथ गुरव

यावेळी शिवसेना शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनीही आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, चाळीस वर्षे डॉ.पाटील यांची धाराशिव जिल्ह्यावर एकहाती सत्ता होती. श्रीमंत खासदारांच्या यादीत डॉ.पाटील तिसर्‍या क्रमांकावर आहेत.  मग आपला जिल्हा मागास जिल्ह्याच्या यादीत तिसर्‍या क्रमांकावर गेला कसा? याचे उत्तर राणा पाटील यांना नितीन काळे यांनी विचारावे. येड्या बाभळीची शेती करुन हा त्यांचा विकास झाला का? शेतकर्‍यांच्या मालकीची तेरणा ट्रस्ट आणि 40 वर्षे सत्ता उपभोगून अमाप माया जमविली आणि इडी, सीबीआयच्या भीतीपोटी राणा पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष काळे एजंटांचा वसुली अधिकारी म्हणून काम करत आहेत. 5 5 1 1 आणि जनता वणवण असे काही वर्षापूर्वी बोलणारे नितीन काळे आज त्याच 5511 मध्ये बसून राणा पाटील यांचे तुणतुणे वाजविण्याचे काम करत आहेत. धाराशिव शहरातील बायपास रोडवरील पर्यायी रस्ता व पथदिवे यासाठी खासदार ओमदादा राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, मा.नगराध्यक्ष नंदु राजेनिंबाळकर यांनी लोकसभा व दिशा समितीच्या बैठकीतून आवाज उठवून अधिकार्‍यांना जाब विचारला. या प्रकरणात अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला. म्हणून केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे खा.राजेनिंबाळकर यांनी पाठपुरावा करुन निधी मंजूर करवून घेतला व मा.गडकरी साहेबांचे जाहीर आभार मानले. धाराशिव शहरातील ज्येष्ठ नागरिकांनीही हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल खासदार, आमदार व मा.नगराध्यक्षांचा यांचा सत्कार केला.

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास घाडगे पाटील यांनी गैरमार्गाने पैसे कमावले असते तर या भाजप सरकारने त्यांच्या मागेही इडी, सीबीआय लावली असती, परंतु भाजपच्या हुकुमशाहीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या ते सोबत आहेत. त्यांनी पैसे कमावले नाहीत परंतु माणसे कमावली हे 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतून दिसेल, असेही सोमनाथ गुरव म्हणाले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!