धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग शहरातून राष्ट्रीय महामार्ग जात आहे.महामार्गावर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढते आहे. भीषण अपघातातील रुग्णांवर वेळीच उपचार व्हावे, यासाठी नळदुर्ग येथे ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यासाठी आपण सातत्याने मागणी करत होतो आज त्याला यश मिळाले असून पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांनी नळदुर्ग येथे उपजिल्हा रुग्णालयात विशेष बाब म्हणून ट्रॉमा सेंटर ला मंजुरी दिली असल्याची माहिती आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
अपघातानंतरचा ‘एक तास’ मोलाचा असतो. याच काळात अपघातस्थळापासून नजीकच्या उत्तम हॉस्पिटलमध्ये उपचार मिळाल्यास अपघातग्रस्ताचे प्राण वाचतात. त्यासाठी नातेवाईकांना भरमसाठ खर्चाचा भार सोसावा लागतो. राज्यातील महत्वाच्या महामार्गांपैकी एक असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ वर अशा तातडीच्या वैद्यकीय सुविधांची कमतरता होती.त्यामुळे अपघातात जखमी झालेल्या अनेकांना वेळेत उपचार न मिळाल्याने आपले प्राण गमवावे लागत होते.त्यामुळे नळदुर्ग येथे ट्रॉमा सेंटर उभारण्यासाठी आपला विधिमंडळात व सरकार पातळीवर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामाध्यमातून पाठपुरावा सुरू होता.
अपघात घडल्यानंतर जखमींना जवळच्या खाजगी किंवा सार्वजनिक रुग्णालयात दाखल केले जात आहे. त्यामुळे शासकीय ट्रॉमा केअर सेंटर असणे फार गरजेचे आहे. त्यामुळे अपघातग्रस्तांना एकाच सेंटरवर सर्व प्रकारचे अत्याधुनिक उपचार मिळणे शक्य होणार आहे. रुग्णाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. तसेच या अशा उपचारांकरिता प्रचंड खर्च येतो, याचा नक्कीच फायदा रुग्णांना मिळणार असल्याचे आ.पाटील यांनी म्हटले आहे.
अपघातग्रस्तांना तासाभरात उपचार मिळतील
” कुठल्याही दुर्घटनेनंतर पहिल्या तासाभरात मिळणारे उपचार एखाद्याचे प्राण वाचवू शकतात. यालाच इंग्रजीत गोल्डन अवर असंही म्हणतात. गोल्डन अवरमध्ये एक-एक सेकंद महत्त्वाचा असतो.ट्रामा केअर सेंटरमध्ये सगळ्या प्रकारच्या अपघातांवर एकाच छताखाली सर्व उपचार अपघातग्रस्तांना मिळणार आहे त्यामुळे अनेकांचे प्राण वाचतील.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब व पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांनी ट्रॉमा केअर सेंटरचे महत्त्व समजून घेत, महामार्गालगत चांगल्या आरोग्य सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने ट्रॉमा सेंटरला मंजुरी दिली त्याबद्दल जनतेच्या वतीने त्यांचे आभार मानत असल्याचे आ.पाटील यांनी म्हटले आहे.
ट्रॉमा केअर सेंटर म्हणजे?
प्रथम दर्जाच्या. या युनिटमध्ये न्यूरोसर्जन, इंटेन्सिव्हिस्ट, जनरल सर्जन, ऑर्थोपेडिकी सर्जन, ऍनेस्थेसिस्ट, निवासी वैद्यकीय अधिकारी आणि कुशल परिचारिका या उपस्थित असतात. तसेच ऑपरेशन थिएटर आणि अतिदक्षता विभागात सर्व प्रकारची अत्याधुनिक उपकरणे, सोयीसुविधा उपलब्ध असतात. आपत्कालीन यंत्रणेसाठी लागणारी साधनसामग्री येथे उपलब्ध असते. रुग्ण दाखल झाल्यापासून त्याची प्रकृती स्थिर होईपर्यंतची सगळी काळजी या सेंटरमध्ये घेतली जाते.