धाराशिव प्रतिनिधी – राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील जाचक अटी रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा आणि आमदार रोहित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार) जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केली.
२ जून २०२६ रोजी शासनाने ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३५ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र, २०१९ च्या कर्जमाफीची मर्यादा तसेच चार वर्षे नियमित कर्जफेडीची अट यामुळे लाखो शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार होते. या जाचक अटी रद्द करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि विविध शेतकरी संघटनांनी सातत्याने आंदोलन उभारले.
पंढरपूर येथील अन्नत्याग आंदोलन, छत्रपती संभाजीनगर येथील एल्गार मोर्चा, मुख्यमंत्री व अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठका, विधिमंडळातील पाठपुरावा आणि सरकारला दिलेल्या अल्टिमेटमनंतर अखेर शासनाने जाचक अटी मागे घेतल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
या निर्णयाचे स्वागत करतानाच उर्वरित शेतकरी प्रश्नांवरही शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यव्यापी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.