लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 / osmanabad Loksabha election 2024
Dharashiv
धाराशिव,दि. 09 ( antarsawad news ) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने 40 – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी 12 एप्रिलपासून नामनिर्देशनपत्र भरण्यास प्रारंभ होणार आहे.नामनिर्देशनपत्र दाखल करतांना उमेदवारांनी घ्यावयाच्या काळजीबाबत भारत निवडणूक आयोगाकडून सर्वसाधारण सूचना निर्गमित करण्यात आल्या आहे. उमेदवारांनी त्या सूचनांप्रमाणे अर्ज दाखल करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी केले आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे भरण्याकरिता फॉर्म 2 ए (कोरे) निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात तसेच भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नामनिर्देशपत्रे अधिसुचित केल्यानुसार दि.12 एप्रिल ते दि.19 एप्रिलपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 च्या दरम्यान सार्वजनिक सुट्टीव्यतिरिक्त उमेदवाराद्वारे किंवा त्याच्या सुचकाद्वारे निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष सादर करणे आवश्यक आहे.
उमेदवाराला नामनिर्देशनपत्र भरण्याकरिता https://suvidha.eci.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन माहिती भरण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. तथापि ऑनलाईन अर्ज भरणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन केलेल्या अर्जाची क्युआर कोड असलेली प्रिंट काढून त्यावर स्वतःची सही करुन तसा अर्ज स्वतः अथवा त्याच्या सुचकामार्फत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष सादर करणे बंधनकारक राहील.
लोकसभा निवडणुकीकरीता अनामत रक्कम सर्वसाधारण उमेदवारांकरीता 25 हजार रुपये आणि अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती उमेदवारांकरीता 12 हजार 500 रुपये इतकी आहे.मागासवर्गीय उमेदवाराने सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्राची प्रत नामनिर्देशनपत्रासोबत जोडणे आवश्यक आहे.
नामनिर्देशनपत्रासोबत उमेदवाराने भारत निवडणूक आयोगाने सांगितल्याप्रमाणे फॉर्म 26 मधील प्रतिज्ञापत्र परिपुर्ण भरुन संलग्न करणे आवश्यक.नामनिर्देशन पत्रासोबत उमेदवाराने 3 महिन्याच्या कालावधीत काढलेले 2 सेंटीमीटर बाय 2.5 सेंटीमीटर या आकाराचे फोटो आणि पूर्ण चेहरा दिसेल असा डोळे उघडे असलेला कृष्णधवल अथवा रंगीत छायाचित्र संलग्न करावे. छायाचित्राच्या मागील बाजूस उमेदवाराचे नाव व स्वाक्षरी असावी.निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार फोटो असावा.
उमेदवाराने निवडणूक खर्चासाठी बँकेत किंवा पोस्टात निवडणुकीसाठीचे नवीन स्वतंत्र खाते उघडणे आवश्यक आहे.निवडणूक खर्चासाठी बॅंक/पोस्ट खाते उघडणे आवश्यक आहे.
नामनिर्देशनपत्रे दाखल करणाऱ्या उमेदवारांसाठी राष्ट्रीय व राज्यस्तरावर नोंदणीकृत व मान्यताप्राप्त राजकीय पक्षामार्फत उमेदवारी दाखल करीत असल्यास 1 सूचक व इतर सर्वांसाठी 10 सूचक आवश्यक असेल. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवार अथवा सुचक यांनी सर्व कागदपत्रांसह दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात हजर राहून शपथ घेणे/दृढ कथन करणे आवश्यक आहे.त्यानंतर कागदपत्र दाखल करण्यासाठी अथवा इतर कोणत्याही कारणासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात प्रवेश देय राहणार नाही.
उमेदवाराचे नाव देशातील कोणत्याही मतदारसंघात असावे तसेच सूचकाचे नाव 40 -उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात असणे आवश्यक आहे.एक सूचक एकापेक्षा अधिक नामनिर्देशन पत्रावर स्वाक्षरी करु शकतो.उमेदवारांचे नाव उस्मानाबाद मतदारसंघात नसल्यास देशातील ज्या विधानसभा मतदारसंघात नोंदविले आहे, त्या मतदारसंघाची मतदार यादीची प्रमाणित प्रत/पुरावा देणे अनिवार्य आहे.
नामनिर्देशन पत्रासोबत नमुना -26 मध्ये 100 रुपयांच्या बॉण्डवर आयोगाने प्राधिकृत केलेले मूळ शपथपत्र जोडणे आवश्यक आहे.शपथपत्रावर प्रत्येक पृष्ठावर उमेदवाराची स्वाक्षरी व नोटरी शिक्का असावा.
नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी 3 वाजतापर्यंत दाखल करणे आवश्यक आहे.राष्ट्रीय,राज्य अथवा इतर नोंदणीकृत पक्षातर्फे उमेदवार उभा असल्यास ए ॲण्ड बी फॉर्म नामनिर्देशनाच्या शेवटच्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यत दाखल करणे आवश्यक आहे.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार उमेदवारांना प्रलंबित खटले,किंवा भूतकाळातील दोषी प्रकरणे याचा तपशील उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेच्या दुसऱ्या दिवसापासून व मतदानाच्या समाप्तीसाठी निश्चित केलेल्या तासाच्या समाप्तीपूर्वी 48 तासांपर्यंतचे प्रचाराच्या कालावधीत तीनवेळा वृत्तपत्रे आणि टिव्ही चॅनलवर गुन्हेगारी प्रकरणाबाबत घोषणा प्रकाशित करणे आवश्यक आहे.
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना 22 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजतानंतर चिन्हांचे वाटप करण्यात येईल.राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यता प्राप्त पक्षाचे अधिकृत उमेदवारास पक्षाचे राखीव असलेले चिन्ह देण्यात येईल.इतर उमेदवारांस प्रथम नामनिर्देशन पत्रात नमूद केलेल्या पसंती क्रमानुसार व उपलब्धतेनुसार मुक्त चिन्हांमधून चिन्ह वाटप करण्यात येईल.अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी दिली.