धाराशिव ( सलीम पठाण ) – धाराशिव शहरातील १४० कोटींच्या रस्त्यांच्या कामांवरून भाजप व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटांमध्ये चांगलाच श्रेयवादाचा कलगीतुरा रंगला आहे. एकीकडे माजी नगराध्यक्ष अमित शिंदे यांनी आंदोलनाच्या माध्यमातून श्रेय घेणाऱ्या गटावर खोटेपणाचा आरोप केला, तर दुसरीकडे शिवसेना नेते पंकज पाटील यांनी अमित शिंदेंना पक्षनिष्ठा स्पष्ट करण्याचे आव्हान देत प्रतिआक्रमण केले.
शिवसेना नेते पंकज पाटील म्हणाले, “अमित शिंदेंनी आधी ठरवावं की ते ताईंचे आहेत की दादांचे? कारण सध्या ते कोणाच्या सांगण्यावरून बोलत आहेत हे समजेनासं झालंय. शहरातील श्रेय हे केवळ आंदोलनामुळे नव्हे तर जनतेच्या लढ्यामुळे मिळालं आहे.” त्यांनी बायोमायनिंगच्या निविदेपासून ते भूमिगत गटार योजनेपर्यंत अनेक मुद्द्यांवर अमित शिंदेंना जाब विचारला.
त्यावर प्रत्युत्तर देताना भाजप नेते अमित शिंदे म्हणाले, “शहरात रस्त्यांचे काम हे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण राज्यासाठी अंदाजित दरापेक्षा अधिक दराच्या निविदांना मनाई केली असून धाराशिवसाठी कोणतीही विशेष सूट देण्यात आलेली नाही.” तसेच, “आंदोलनाचा बनाव करून उबाठा गट खोटं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे,” असा आरोपही त्यांनी केला.
शहरात भुयारी गटारी, बायोमायनिंग, आणि डंपिंग यार्डसारख्या महत्त्वाच्या कामांवरून दोन्ही गटांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आणि अपयशाचे आरोप करत जनतेला भ्रमित केल्याचा आरोप परस्परांवर केला आहे.
शहरातील जनतेला या आरोप-प्रत्यारोपांमधून नेमकं सत्य काय, हे शोधणं गरजेचं झालं असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद अजून गडद होण्याची शक्यता आहे.
धाराशिव शहरातील बस स्थानकाच्या मुद्द्यावर , शहरातील कचऱ्याच्या मुद्द्यावर, बेरोजगारीच्या मुद्द्यावर , कुणीही बोलायला तयार नाही व श्रेय घ्यायला तयार नाहीत नीतीमंडळी निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. कामे न करता मतदान मागायला येणाऱ्यांना आम्ही मतदान करणार नाही अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.
दोघांनी प्रेस नोट द्वारे दिलेल्या प्रतिक्रिया खालील प्रमाणे आहेत.

अमित शिंदेनी मालक निश्चित करावा, ताई की दादा! अनं मग सामाजिक मुद्द्यावर बोलावे – पंकज पाटील
अगोदर पक्ष ठरवावा म्हणजे ते सध्या दादाचे आहेत की ताईचे? कारण आता हे नेमक कोणाच्या सांगण्यारून बोलत आहेत याबद्दल शंका येऊ लागली. श्रेय आमचं नाहीच, जनतेच्या लढ्याच यश आहे हे आम्ही आजवर सांगत आलोय मग मिरची झोंबायचं कारण काय?असा सवाल शिवसेना नेते पंकज पाटील यांनी विचारला आहे.
पंकज पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस झाले तेव्हा हा निर्णय झाला असं अमित सांगत आहेत पण ही निविदा 8 मार्च 2024 ला प्रसिद्ध झाली. आतापर्यंत ही निविदा का उघडण्यात आली नाही याचे श्रेय राणा पाटील घेतील का? यावर अमित यांनी बोलावे. दुसरा विषय बायोमायनींग त्याच्या बाजूने सभागृहात सर्वात जास्त राणा पाटील यांचेच नगरसेवक होते. त्यावेळी तुम्ही सभागृहात नव्हता पण आमच्या ताई होत्या त्यांना विचारा असेही पाटील यांनी सांगितले. त्या कामात 17 टक्के अधिकची निविदा येऊनही आपण विरोध का केला नाही मग तुमचे हात ओले झाले नाहीत का? यावर पण यांनी बोलावे. भुयारी गटार योजना तर तुमचे नेते अजित दादा पवार यांच्याकडे मागणी करणारे सध्याचे तुमचे नेते (त्यासाठीच तुम्ही नेमक कोणाचे ) राणा पाटील यांनी या योजनेची मागणी केली होती. याबाबत तुम्ही अर्चना ताई यांना विचारू शकता.

१४० कोटींच्या रस्त्यांचे निविदा प्रकरण:
निर्णय फडणवीसांचा, पण उबाठाचं श्रेय नाट्य
“बेगानी शादी में अब्दुला दिवाना” –खोटे श्रेय घेण्यासाठी आंदोलनाचा स्टंट- माजी नगराध्यक्ष अमित शिंदे
राज्यात नगरविकासच्या कामात यापुढे कोठेच जास्तीच्या दराने निविदा मान्य केली जाणार नाही असा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतला आहे. ही बाब जगजाहीर आहे मात्र शहर खड्ड्यात घालणारे स्वतःचे अपयश झाकण्यासाठी आंदोलनाला यश आल्याचा कांगावा करीत स्वतःची पाठ स्वतःच्या हातानेच थोपटून घेत आहेत.नागरिकांची मागणी नसताना भुयारी गटार योजना शहराच्या माथ्यावर थोपली गेली. त्यातून कोणाचे उखळ पांढरे झाले हे सर्वांनाच माहीत आहे. भुयारी गटारीच्या कामामुळे शहरातील सगळे रस्ते खड्ड्यात गेले. मात्र त्याच्या दुरुस्तीसाठी सत्तेत असताना निधी आणावा अशी यांना जारदेखील गरज वाटली नाही. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी धाराशिव शहरातील रस्त्यांच्या कामासाठी निधी आणला.असे असताना
स्वतःचा अपयशी कार्यकाळ झाकण्यासाठी आंदोलनाचा स्टंट करत असल्याचा आरोप अमित शिंदे यांनी केला आहे.
आंदोलनामुळे शहरवासीयांच्या खिशातले २२ कोटी रुपये वाचले असल्याचा खोटा बनाव करणारे बायोमायनिंग कामाच्या वेळी तोंड शिवून का गप्प बसले होते घनकचऱ्याचे बायोमायमिंगची निविदा १७ % जास्तीच्या दराने काढली तेंव्हा का आंदोलन केले नाही? १७ टक्क्यांनी जास्तीची निविदा भरल्यानंतर कोणाच्या घशात तो पैसा गेला? गरज नसताना आणि शहरवासीयांची मागणी नसताना भूमिगत गटार योजना राबविण्यात कोणाचे हित होते? टक्केवारीसाठी अजिबात गरजेची नसलेली योजना राबवताना रस्ते खड्ड्यात कोण घातले? त्यावेळी सत्तेत असणारे आमदार आणि खासदार यांनी शहरातील रस्त्यांसाठी का निधी आणला नाही? त्यावेळी सरकार तुमचेच होते, तुमचे मुख्यमंत्री होते,आमदार,खासदारही तुमचेच होते मग रस्त्यासाठी निधी आणावा अशी गरज तुम्हाला का वाटली नाही? केवळ कांगावा करण्यापेक्षा याचे उत्तरही जनतेला द्या असे आव्हान माजी नगराध्यक्ष शिंदे यांनी दिले आहे.
डीपी रस्त्याच्या कामांना आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यामुळे मंजुरी मिळाली असून आमच्या प्रामाणिक पाठपुराव्याला आलेल्या यशाचा श्रेय घेण्यासाठी उबाठा गट प्रचंड खोटारडे दावे करत सुटला आहे. “आंदोलनामुळेच हे झाले” असा डांगोरा पिटत या गटाने जनतेची दिशाभूल करण्याचा सपाटा लावला आहे. हेच ते लोक आहेत जे ‘आयत्या पिठावर रेघोट्या’ ओढण्यात पटाईत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः अंदाजित दरापेक्षा अधिक दराच्या कामांना मान्यता न देण्याचे स्पष्ट आदेश दिले असून, ही राज्यभर लागू असलेली धोरणात्मक भूमिका आहे. केवळ धाराशिवसाठी हा निर्णय झाला असल्याचा खोटा प्रचार करून उबाठा गट जनतेची फसवणूक करत असल्याचे अमित शिंदे यांनी म्हटले आहे.