धाराशीव : तुळजापूर – सोलापूर – धाराशिव रेल्वे रेल्वेसाठी केंद्राकडून निधी मिळून सुद्धा ठाकरे सरकारने राज्याच्या हिश्याचा निधी दिला नाही. युती सरकार अस्तित्वात आल्यावर या रेल्वेसाठीचा राज्याचा निधी मिळाला आणि टेंडर प्रक्रिया सुरू झाली. मग श्रेय घेण्यासाठी कसे विरोधक कसे पुढे येतात? असा सवाल आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आज केला.
लोकसभा निवडणूक 2024 साठी धाराशीवच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
राणा जगजितसिंह पाटील म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आई भवानीच्या तुळजापूरचा उल्लेख करीत याला मोठे तीर्थक्षेत्र म्हणून आपल्याला विकास करायचा आहे असे सांगितले होते. तसेच तुळजापूर हे रेल्वेच्या नकाशावर आपण निश्चितपणे आणू; एकदा का भाविक इथे येऊ लागले, की इथली अर्थव्यवस्था बदलेल आणि या अर्थकारणाच्या माध्यमातून इथल्या स्थानिक लोकांना प्रचंड चालना मिळेल 2019 मध्ये त्यांनी त्याचं भूमिपूजनही केलं. मात्र त्यानंतर ठाकरे सरकार आलं. त्यांना मी वेळोवेळी विनंती केली की, तुळजापूर – सोलापूर – धाराशिव रेल्वे रेल्वेसाठी 50% केंद्राचा निधी आणि 50% राज्याचा निधी द्यायच ठरलं आहे. केंद्रांनी त्यांच्या बजेटमध्ये तशी तरतूद देखील केलेली आहे मात्र मी वारंवार पाठपुरावा करून देखील ठाकरे सरकारने त्यासाठी एक रुपया देखील दिला नाही.
पुढे बोलताना राणा जगजितसिंह पाटील म्हणाले, त्यानंतर शिंदे सरकार आलं आणि यासंदर्भात तातडीने निर्णय झाला. या रेल्वेसाठीच टेंडर देखील निघाला असून अर्थमंत्री अजित पवार यांनी यासाठी निधी देखील मंजूर केला आहे. टेंडर प्रक्रिया सुरू झाली असून ते काम आता अंतिम टप्प्यात आहे. ठाकरे सरकारने यापूर्वीच या कामाला निधी दिला असता तर आतापर्यंत रेल्वे आली असती.
दरम्यान, आपण ‘जय भवानी जय शिवाजी’ असं म्हणतो तर तुळजाभवानी ही आपली कुलस्वामिनी आहे. मी ठाकरे सरकारकडे विनंती केली होती की पर्यटन खात्याकडून या रेल्वेचा आणि तुळजापूरच्या विकासाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवा केंद्र त्यासाठी शंभर टक्के अर्थसाहाय्य करेल. पण केवळ या खात्याकडून आदित्य ठाकरे यांनी शिफारस म्हणून प्रस्ताव पाठवला, असे देखील राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितले.