धाराशिव ता. २९: आहे त्या योजना राबविण्याकडं दुर्लक्ष होत असतानाही नुसत्याच पोकळ घोषणा देत सरकार चुनावी जुमला असल्याचा घणाघात आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात केला. आमदार पाटील म्हणाले, जिल्ह्याचा महत्वाचा प्रकल्प म्हणुन कृष्णा मराठवाडाकडे पाहिले जाते. अगोदरच्या सरकारने याला प्राधान्यक्रम ठरवुन दिला होता तो काढुन टाकण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. यासाठी त्या काळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व मंत्री जयंत पाटील यानी सातशे कोटी रुपयाची तरतुद केली. पण चालु सरकारने याची निविदा व कार्यारंभ आदेश देण्यास एक वर्ष लावला.
रामदरा व दुधाळवाडी पर्यंत पाणी पोहचण्यासाठी तीन हजार कोटीची गरज आहे. त्यानुसार लवकर प्रकल्प व्हायचा असेल तर प्रत्येक वर्षी किमान दिड हजार कोटीची तरतुद केली पाहीजे. पण सरकारने फक्त पाचशे कोटी रुपये मंजुर करुन अपेक्षाभंग केल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला. तसेच महाविकास आघाडीने मंजुर केलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला जागा निश्चितीसाठी दोन वर्ष लावली. या बांधकामासाठी विभागाने तीनशे कोटीची मागणी केली पण ती देखील सरकारने पुर्ण केली नाही. आता नविन महाविद्यालयाच्या यादी वाचुन दाखवण्याऐवजी मंजुर महाविद्यालयाना निधी दिल्यास ते संयुक्तीक ठरेल अशीही अपेक्षा आमदार पाटील यांनी व्यक्त केली. मतदारसंघात कसबे तडवळे गावात १९४१ साली डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महार-मांग वतन परीषद घेतली होती. त्यामुळ शासनाने याठिकाणी स्मारक करण्याची घोषणा केली. पण त्या जिल्हा परिषद शाळेचे हस्तांतरण करण्या अगोदर त्यांना जागा देणं आवश्यक आहे. त्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. तो मंजुर करुन त्यास भरीव निधी द्यावा,त्या शाळेच्या बांधकामासाठी आता फक्त ९६ लाख रुपये इतकाच निधी दिला असुन आंतरराष्ट्रीय स्मारक होण्याच्यादृष्टीनं भरीव असा निधी आवश्यक असल्याचे आमदार पाटील म्हणाले. शहरात आण्णाभाऊ साठे यांच स्मारक व्हावे अशी कित्येक वर्षाची मागणी आहे. त्यासाठी दुग्धविकास विभागाची जमीन मिळावी यासाठी जिल्हाधिकारी व समाज कल्याण आयुक्तामार्फत २३ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रस्ताव दिला आहे. तसेच एक वर्षापासुन मी स्वत:याबाबत बैठक घेण्यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करत आहे. २७ फेब्रवारी २०२४ रोजी ही बैठक ठरली असताना ती रद्द करण्यात आल्याचे सांगुन आमदार पाटील यांनी हीच का तुमची गतिमानता असा प्रश्न उपस्थित केला. चोराखळी हे गाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे आजोळ आहे.
आपण त्यांची त्रिशताब्दी साजरी करत आहोत अशावेळी या गावामध्येही अहिल्यादेवीचे स्मारक होऊन येथील बारव, कुंड तसेच ऐतिहासिक वास्तुचे काम व्हावे अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. उर्जाविभागाकडुन आरडीएसएस ही योजना राबवली जात असुन जिल्ह्यातील ४२ उपकेंद्रांची व नविनअतिरिक्य ट्रान्सफार्मरचे कामे होणे आवश्यक आहे. दुष्काळी स्थितीत पाणी असतानाही विजेअभावी पिके जोपासता आली नसल्याचे सांगुन किमान पुढच्यावर्षी तरी शेतकऱ्यांना त्याची मदत होईल अस मत आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केले.